कोल्हापूरचा प्रसिद्ध शाही दसरा
देशात म्हैसुरचा शाही दसरा सुप्रसिद्ध आहे.त्याचबरोबर कोल्हापूरचा देखील शाही दसरा प्रसिद्ध आहे. हिंदवी स्वराज्य निर्माण करणाऱ्या शिवछत्रपती आणि रणरागिणी छ. ताराराणी यांचा वारसा सांगणाऱ्या करवीरच्या ऐतिहासिक दसरा सणाला शतकोत्तर परंपरा आहे. छ. राजर्षी शाहू महाराज यांच्या काळात कोल्हापूरच्या नवरात्रौत्सव आणि दसरा सणाला सामाजिक किनार लाभली. त्यांच्या या कार्याचा वारसा आजही करवीर नगरीने जपला आहे.१७८८ पर्यंत पन्हाळगडावर दसरा साजरा व्हायचा. पुढील काळात करवीर छत्रपतींची राजधानी पन्हाळगडावरून कोल्हापुरात नेण्यात आली. तेव्हापासून दसरा करवीरनगरी कोल्हापुरात साजरा होऊ लागला.
महाराष्ट्रातील इतिहास पाहिला तर, छ. शिवाजी महाराजांच्या अगोदर सुध्दा पावसाळ्यातील शेतीची कामे उरकली की, शेतकरी सैनिक बनून मुलूखगिरीवर जायचे. खंडेनवमीला शस्त्रपूजन करून दशमीला विजय साजरा करण्यासाठी सीमोल्लंघन केले जात असे.नंतरच्या काळात गावाची सीमा ओलांडून आपट्याची पाने म्हणजे सोने लुटण्याचे कार्यक्रम होऊ लागले. संस्थान काळात सीमोल्लंघनासाठी मिरवणूक काढली जायची. ही मिरवणूक गावाच्या बाहेर गेल्यानंतर सोने लुटण्यासाठी लोक एकत्रित येऊ लागले.चौफाळा माळ ते दसरा चौक
कोल्हापूर मध्ये जुना राजवाड्या भोवताली तटबंदीच्या बाहेर म्हणजे गंजीमाळ येथे दसरा होत होता. कालांतराने बावडा येथे नवीन राजवाडा बांधला गेला. राजर्षी शाहू महाराज नव्या राजवाड्यात राहायला गेल्यानंतर दसरा सण ‘चौफाळा माळ’ येथे साजरा होऊ लागला. म्हणुन या माळाला दसरा माळ नाव पडले. आज या माळाला ‘दसरा चौक’ या नावाने ओळखले जाते.सध्या दसरा चौक शहराच्या मध्यवस्तीत आहे. त्यापूर्वी हा चौक गावाबाहेर माळावर होता.रा.शाहू महाराजांच्या काळात दसऱ्या दिवशी भव्य मिरवणूक जुना राजवाडा ते दसरा चौक अशी निघायची. या मिरवणुकीत छत्रपती घराण्यातील व्यक्तींसह सरदार, जहागीरदार, मानकरी यांचा समावेश असायचा. याचबरोबर पारंपरिक लवाजम्यात हत्ती, घोडे, उंट, शिकारखान्यातील वाघ, चित्ते यासह लष्करी दलातील पायदळ- घोडदळ, परिटघडी पोषाखातील पायदळातील सैनिक, भालदार, चोपदार, म्हालदार, विटेकरी, पोलीस दल, पट्टेवाले, रक्षक, हुजरे, जासूद हा सारा ताफा यामध्ये असायचा. सोबत तोफांचा खडखडा यांचा समावेश असायचा. सहभागी होणाऱ्या उंट आणि हत्तीच्या पायात चांदीच्या साखळ्या, रंगीत झूल असे. हत्तीच्या मस्तकावर ओम हा प्रणव लिहिलेला असायचा. चोपदाराच्या हातात देखील चांदीची काठी असायची. काही सरदार हत्तीवर बसलेले असायचे. एक हत्ती आणि त्यामागे सहा घोड्यांचे पथक, पुन्हा एक हत्ती आणि त्यामागे घोड्याचे पथक असायचे. घोड्याच्या सोन्याच्या रथात महाराज असायचे. हा रथ सजवलेला असायचा.भवानी मंडपातून छबिना सुरू झाला की त्याचा लवाजमा टाऊन हॉल बागेपर्यंत दिसायचा. यावरून हा लवाजमा किती मोठा असायचा हे लक्षात येते. या छबिन्यात दोन घोडे जुंपलेला एक पिंजरा असे. त्यामध्ये चित्ता असायचा. त्याचे डोळे बांधलेले असायचे. काही सुभेदारांच्या हातात गरूड, ससाना पक्षी देखील दिसायचे. या छबिन्यात ब्रिटीश काळात तत्कालीन ब्रिटिश अधिकारी सहभागी व्हायचे. त्याचबरोबर विशाळगडकर, कागलकर, बावडेकर, सरलष्कर, तोरगलकर, हिम्मत बहाद्दर, चव्हाण हे जहागीरदार असायचे. त्यांच्या पाठोपाठ सर जोशीराव, राजोपाध्ये, राजाज्ञा, पंडितराव सरदार, इनामदार, दुमालदार असे सारे संस्थानकाळातील कारभारी असायचे. पारंपरिक वाद्यांच्या गजरात हत्तीवर राजघराण्याचं निशाण व जरिपटका असायचा. लवाजमापाठोपाठ फुलांनी सजविलेल्या करवीर निवासिनी अंबाबाई, तुळजाभवानी, गुरू महाराज यांच्या पालख्या असायच्या. महिला छबिन्यातील रथाची पूजा करत. जात पात विसरून सर्वांना एकत्र आणणारा हा छबिना असायचा.जुना राजवाड्यातून पारंपरिक मार्गावरून ही भव्य मिरवूणक दसरा चौकात यायची.भवानी मंडप ते दसरा चौक या दोन्ही मार्गावर हा लवाजमा पाहण्यासाठी नागरिकांची तुडुंब गर्दी असायची. त्यानंतर मावळत्या दिनकराच्या साक्षीने दसरा चौकात प्रचंड गर्दीत ऐतिहासिक सोहळ्याला उत्साह यायचा.
भारतीय स्वातंत्र्यानंतर संस्थान खालसा झाल्यानंतर शाही दसऱ्याचा बाज कमी झाला. तोफांची सलामी बंद झाली आणि त्याऐवजी बंदुकीच्या फैरी झाडण्यात येऊ लागली. प्राण्यांचा लवाजमा कमी झाला. हत्ती, उंट, चित्ता,पक्षी बंद झाले. संस्थानकाळात भवानी मंडपातून महाराज रथातून सहभागी व्हायचे. पण स्वातंत्र्यानंतर मेबॅक गाडीतून राजघराण्यातील व्यक्ती न्यू पॅलेसवरुन थेट दसरा चौकात शाही दसरा कार्यक्रमास सहभागी होतात.
मिरवणुकीचा थाट आजही कायम आहे. हत्ती-घोडे- उंटांची जागा स्वयंचलित वाहनांनी घेतली आहे. यामध्ये छत्रपती राजाराम महाराज यांनी जर्मनीतून आणलेली ‘मेबॅक असते. आजही दसरा चौकात भव्य शामियाना उभारला जातो. शहरातील मान्यवर, मोतीबाग तालमीतील तगडे मल्ल फेटा घालून छबिन्यात सहभागी होतात. त्यांच्या मागे करवीरनिवासिनी अंबाबाई, तुळजाभवानी आणि गुरुमहाराजांच्या पालख्या असतात. भाऊसिंगजी रोड ते दसरा चौकात नागरिकांकडून पालख्यांचे स्वागत केले जाते.
चौकाचौकात ठासणीच्या बंदुकीच्या फैरी उडवल्या जातात. त्यामुळे सोने लुटण्यासाठी छबिना निघाला आहे याची माहिती लोकांना मिळते. दसरा चौकात पालख्या आल्यावर त्या सदरेवर ठेवण्यात येतात. दसरा चौकात उभारण्यात आलेल्या छबिन्यात पारंपरिक वेषातील सरदार, इनामदारी घराण्यातील व्यक्ती बसतात. प्रत्येक घराण्याची वेगळी पगडी असते. राजघराण्यातील व्यक्तीसाठी छबिन्यात मध्यभागी शाही बैठक मांडण्यात आली असते. दोन्ही बाजूला लाल रंगाच्या वेषातील भालदार, चोपदार, चोऱ्या झाडणारे मानकरी उभे असतात.त्याचबरोबर करवीर नगरीतील मान्यवर, लोकप्रतिनिधी, सरकारी अधिकारी,यांच्यासाठी बसण्याची खास सोय केलेली असते.
राजघराण्यातील सदस्य राजेशाही वेषात असतात. डोक्यावर छत्रपतींची पगडी, हातात तलवार, रुमाल असतो. मेबॅक वाहनांसमोर शहर वाहतूक शाखेच्या वाहनांचा असतो. जिप्सी वाहनाच्या मागे शहर वाहतूक शाखेतील पोलीस मोटार सायकलवर असतात. त्यांच्या मागे महाराजांची मेबॅक असते. मेबॅकमध्ये श्रीमंत शाहू महाराज, युवराज संभाजीराजे, युवराज मालोजीराजे. युवराज शहाजीराजे, युवराज यशराजे, यशस्वीनीराजे असतात. दसरा चौकात वाहनांचा लवाजमा आल्यावर महाराजांचे टाळ्यांच्या कडकडात स्वागत होते. करवीरकरांचे अभिवादन स्वीकारत दसरा चौकात वाहने आल्यानंतर पोलिस बॅडवर करवीर संस्थानाची धून वाजवली जाते. भालदार, चोपदार शाहू महाराज आल्याची ललकारी देऊन वर्दी देतात. राजघराण्यातील सदस्य सरदार, मानकरांचे मुजरे स्वीकारात सदरेवर येतात. तिथे दसरा समितीच्यावतीने राजघराण्यातील सदस्यांचे पुष्पहार घालून स्वागत होते.
स्वागत झाल्यानंतर लाल गालिच्यावरुन महाराज सोने लुटण्यासाठी लगडकोटाकडे येतात. छत्रपतींचे राजपुरोहित दादर्णे यांनी केलेल्या मंत्रोघोषात शाहू महाराज आपट्यांची पूजा करतात. त्यानंतर तुळजाभवानी देवीची दुर्गे दुर्घट भारी.... ही आरती सुरू होते. यावेळी सर्व सरदार, मानकरी, करवीरकर टाळ्या वाजवून देवीची आरती करतात. आरती झाल्यानंतर महाराज आपट्यांची पाने तोडून सोने लुटतात. त्यानंतर ठासणीच्या बंदुकीच्या फैरी झाडल्यावर करवीर जनता दसरा चौकात धाव घेतात. लकडकोटातील सोने लुटण्यासाठी चढाओढ सुरू असते. यावेळी नागरिकांची प्रचंड झुंबड उडते. आपट्यांच्या पानाचे भारे उधळले जातात. सोने लुटण्यासाठी प्रसंगी हातघाईही होते.
शमीपूजनाचा पारंपरिक सोहळा छत्रपतींच्या हस्ते झाल्यानंतर तोफ वाजते. यानंतर आपट्याची पाने म्हणजे सोने लुटण्याचा सोहळा होतो. यावेळी दसरा चौकात हजारो लोक उपस्थित असतात.
सोने लुटल्यानंतर छ. शाहू महाराज राजघराण्यातील सदस्यांसह पुन्हा शाही सदरेवर येतात. तिथे सरदार, मान्यवरांकरुन आपट्यांची पाने स्वीकारतात. नंतर राजघराण्यातील सदस्य मेबॅक गाडीमध्ये बसतात. त्यानंतर रस्त्यांच्या दोन्ही बाजूला असलेल्या करवीरकर नागरिकांकडून आपट्यांची पाने राजघराण्यातील सदस्य स्वीकारत गाडी पुढे पुढे जात असते. हा सोहळा पाहण्यासाठी अबालवृद्ध मोठी गर्दी करतात. नंतर राजघराण्यातील सदस्य नविन राजवाड्यावर जातात. वाड्यावर सोने देण्याचा कार्यक्रम झाल्यावर छ. शाहू महाराज करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनाला जातात.
असा हा कोल्हापूरचा शाही दसरा.

छत्रपतींची मेबॅक कार
छत्रपती राजाराम महाराज यांनी इसवी सन १९३६ च्या सुमारास इंग्लंड येथील ‘रोल्स राईस’ या कंपनीला मेबॅक गाडी बनविण्याची ऑर्डर दिली. कोल्हापूर (करवीर) संस्थानच्या ध्वजाचा रंग (सॅफरॉन), छत्रपतींचा शिक्का (मोर्तब), शिवछत्रपतींना तलवार देणारी भवानी अशी वैशिष्ट्ये मेबॅकवर एकवटली आहेत. गाडीचा मूळ क्रमांक (वीवायएफ ८७७६) असा होता. मात्र, कोल्हापुरात आणल्यानंतर या गाडीचा क्रमांक कोल्हापुर १’ असा करण्यात आला. मेवॅक गाडी १७ फूट लांब ६ फूट रुंद असून यात ६ लोक ऐसपैस बसू शकतात. केवळ हाताच्या बोटाने ऑपरेट करता येणारी गिअर सिस्टीम, २०० लिटर क्षमतेचा पेट्रोल टँक, रेल्वेच्या शिटीसारखा पण कर्णकर्कश नसणारा हॉर्न, उन्हाचा त्रास न होणाऱ्या टिटेड ग्लासच्या काचा अशा छोट्या- छोट्या वैशिष्ट्यांनी परिपूर्ण बनविण्यात आली आहे.