अस्तित्वात नसुनही प्रसिद्ध असलेले कोल्हापूरचे "तावडे हॉटेल"
आज या फाटय़ाला हॉटेलचे अस्तित्व सांगणारा एकही प्रत्यक्ष पुरावा नाही, पण ‘तावडे हॉटेल’ माहीत नाही असा एकही ट्रक, लक्झरी, एसटी ड्रायव्हर मुंबईपासून कन्याकुमारीपर्यंत मिळणार नाही.
दुसऱ्या महायुद्धा दरम्यान १९४५ दरम्यान शंकर कदम तथा तावडे यांनी एका खोपटात ‘हॉटेल’ सुरू केलं. हॉटेल साधं छपराचं, पांढऱया रंगाच्या भिंतींचं. दारात दोन लाकडाची बाकडी, रात्री एका बांबूला अडकवलेला मिणमिणता कंदील. त्या काळात ते हॉटेल म्हणजे जाणाऱया-येणाऱयांसाठीचा क्षणभराचा विसावाच होता. या हॉटेलात चहा, भजी आणि बिस्किटाचा पुडा मिळायचा. शंकर कदम आणि त्यांची बायको गिरिजाबाई हॉटेल चालवायचे व सहकुटुंब हॉटेलच्या मागेच एका छपरात राहायचे. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात पोलंडचे निर्वार्सित वळिवडय़ाला निर्वार्सित छावणीत राहायचे.त्यांच्या साठी सरकार कडुन काहीना काही मदतीचे सामान याच फाटयावर म्हणजे तावडे हॉटेलच्या दारात उतरविले जायचे. हे तावडे हॉटेल म्हणजे रात्री-अपरात्री येणाऱ्या-जाणाऱ्या वाटसरूंचा आधार होतं. हॉटेलच्या दारातील मिणमिणता कंदील हे एकटय़ा-दुकट्या वाटसरूला आधाराचं वाटायचा. या मार्गाकरून जाणाऱ्या प्रत्येक ट्रक ड्रायक्वरचं हक्कानं थांबण्याचं ठिकाण म्हणजे ‘तावडे हॉटेल’.ऍल्युमिनियमच्या पेल्यातलं पाणी आणि कपभर चहा येथे मिळायचा.मग हळुहळू मागणीवरून चिवडा मिळु लागला.व काही ट्रक ड्रायव्हर येथे थांबु लागले.त्यावेळी ढाबा संस्क्रूती नव्हती.हे हॉटेल म्हणजे कोल्हापूरची अोळख बनले.येथील थांब्याला आपसुकच "तावडे हॉटेल" हे नाव मिळाले.
१९८० च्या सुमारास शंकर कदम यांचे निधन झाल्यावर त्यांची मुले पांडुरंग, बाबासाहेब, निवृत्ती , केरबा,आणि मुलगी हौसाबाई यांनी काही काळ हे हॉटेल चालवलं.एव्हाना चहाबरोबर फरसाण,बर्फी,चिवडा,भजी हे खाद्यपदार्थ मिळु लागले होते.पण पांढरपेशी लोक या हॉटेल कडे वळत नव्हते.१९९९ ला अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना पुणे बेंगलोर महामार्ग चार पदरी मंजूर झाला. याचे काम सुरू असताना जमीन संपादनात या हॉटेलचे अस्तित्व पुसले गेले.. त्या रस्त्याखालीच ‘तावडे हॉटेल’च्या खोपटाचा शेवट झाला. या गोष्टीला वीस वर्षे झाली, ‘तावडे हॉटेल’चं इथं कसलंही अस्तित्व नाही, पण ‘तावडे हॉटेल’च्या आठवणी जाग्या आहेत. त्यामुळेच ‘तावडे हॉटेल’ नसले तरीही त्याची ओळख मात्र राहिली अन् राहणारच आहे. आज येथे हॉटेल नाही पण "तावडे हॉटेल" चा थांबा आहे.आजही मी गांधीनगरला जातो त्यावेळी तावडे हॉटेलची हटकुन आठवण होते.
शब्दांकन-अनिल पाटील पेठवडगाव
9890875498