पेठवडगावची पुस्तकशाळा : 'श्री महालक्ष्मी नगर वाचनालय पेठवडगाव
byAnil Patil-
पेठवडगावची पुस्तकशाळा : 'श्री महालक्ष्मी नगर वाचनालय पेठवडगाव
वारणामाईच्या निसर्ग सुंदर हिरवाईने नटलेल्या परिसरात वडगाव गाव वसले आहे.कसबा वडगाव, राजाचे वडगाव अशी नावे वागवित या गावी पेठ वसल्याने आता पेठवडगाव म्हटले जाते.सरसेनापती धनाजीराव जाधव यांचे स्मूतीस्थळ येथेच आहे.शतकोत्तर रौप्य महोत्सवी नगरपरिषद असलेल्या या वडगाव मध्ये गावच्या विकासाच्या किंवा जनमानसांच्या बौद्धिक विकासाच्या दृष्टीने तत्कालीन लोकल बॉडीने १ जानेवारी १९७० रोजी 'श्री महालक्ष्मी नगर वाचनालय' या नावाने या गावासाठी वाचनालय सुरू केले.त्यावेळी या वाचनालयाची सुरुवात म्हणुन १२१ पुस्तके खरेदी केली गेली ,सुरूवातीला ५ दैनिके दै पुढारी, दै समाज, दै सत्यवादी,दै सकाळ दै मॅचेस्टर(सध्याचे महासत्ता)येत असत, नंतर पाक्षिके साप्ताहिके येऊ लागली लोक नियमित वाचनालयात येऊन वाचन करत असत. तेथून या प्रवासास सुरुवात झाली ती आज पुस्तकांची संख्या २०,००० हुन जास्त आहे.भारतीय ग्रंथ ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉक्टर शियाली रामामृत रंगनाथन यांनी ग्रंथालयाची संकल्पना साकारली त्यांनी याबाबत पाच सूत्रे तयार केली यामध्ये त्यांनी पाचवे सूत्र हे म्हणजे ग्रंथालय ही वर्धिष्णू संस्था आहे याचा अर्थ वाढत जाणारी संस्था आहे असा होतो.त्यांच्या प्रेरणेने व महाराष्ट्र शासनाच्या मदतीने वाचनालय चळवळीचा पाया वडगाव मध्ये घातला गेला. या ग्रंथालयात असणारे नियम हे पालिकेचे असून त्यानुसार वाचनालय चालू असते.
ग्रंथपाल सुनील काशीद
वाचनालयाची वर्गवारी पाहिली तर इतर ब या वर्गात आहे. सुरूवातीस वाचनालया साठी स्वतंत्र इमारत नव्हती. त्यानंतरच्या काळात सन २००१ मध्ये इमारत मंजूर झाली.व वाचनालय सुसज्ज इमारतीत सुरू झाले. वाचनालयामध्ये ग्रंथालयाचे वर्गवारी पाहिली असता मराठी कथा, कादंबरी इत्यादींची संख्या दहा हजार हुन जास्त इतकी तर इंग्रजी तीन हजार इतकी व हिंदी २००० आहे.त्याचबरोबर ,बालसाहित्य,धार्मिक ग्रंथ इतर ४१८२ सरासरी होती त्यामध्ये एकूण २२,००० इतकी पुस्तके आज रोजी वाचनालयात आहेत. त्याचबरोबर मासिके त्रैमासिके, साप्ताहिके पाक्षिके व वर्तमानपत्र अशी एकूण सुमारे ३५ अंक वाचकासाठी दररोज उपलब्ध असतात. वाचकांची सरासरी संख्या ही रोज शंभर ते सव्वाशे पर्यंत असुन नियमित सभासद सुमारे ६०० आहेत.त्याचबरोबर अभ्यासू किंवा स्पर्धा परीक्षा देणारया विद्यार्थ्यांसाठी त्या अभ्यासाची पुस्तके व अभ्यासिका ऊपलब्ध करून दिली आहे. वडगावकरांचा शिरस्ता म्हणजे दिवसभराचं काम धाम आटोपले की सहज बाजारपेठेत फेरफटका मारावा कधी वाचनलयात जावं.वाचनालयाच्या वरच्या मजल्यावर बसून वृत्तपत्रं वाचावीत. अगदी हवी तेवढी.तुम्ही जर सभासद असाल तर घरी न्यावीत.काही वाचकप्रेमी लोकांचे कधी कधी फिरायला जायचं निमित्त असायचं पण जायचे असायचे ते वाचनालयात.काहींना तर इतकी सवय की घरातून विशिष्ठ कामास्तव बाहेर पडले की काम विसरून पावले आपसुख इकडे वाचनालयात वळायची.वाचनवेड संपल्यावर घरी गेल्यावर लक्षात यायचे की अरेरे ते आपले काम राहिले. प्रारंभीला काहि थोडक्या पुस्तकानिशी सुरू झालेली हि लायब्ररी आज हजारो पुस्तकांनी समृद्ध आहे. कोणाहि इच्छूकाने येथे यावे आणि खुशाल पुस्तक वाचावे. त्यासाठी फार काहि करावे लागत नाही.सभासद वाचकांना अगदी नगण्य मासिक शुल्कात पुस्तके घरी नेवून वाचता येतात.येथील मासिक वर्गणी अजुनही फक्त १० रूपये आहे इथे साहित्याचे अनेकविध प्रकारची पुस्तके आहेत. इतिहास, काव्य, धार्मिक, विविध शास्त्रे, कादंबरी, प्रवासवर्णने, चरित्रे, आत्मचरित्रे, वैचारिक असे अनेकविध प्रकारची ग्रंथसंपदा इथे आहे. धार्मिक ग्रंथामध्ये तर पुराणांपासून सांप्रतचे विविध पंथापावेतो अनेक ग्रंथ आहेत. चिकित्सक अभ्यासकांना लागणाऱ्या कोषाचा तर स्वतंत्र विभागच इथे आहे. त्यांनी यावे आणि बसून कोणताही ग्रंथ अभ्यासावा. त्याला प्रत्यावाय नाही. त्याशिवाय अनेक जुनी दुर्मिळ संपदा आहे. मराठी बरोबरच हिंदी, इंग्रजीचाही स्वतंत्र संपन्न विभाग आहे.
५० वर्षाकडे यशस्वीपणे वाटचाल
हे वाचनालय करत आहे. दैनिके, साप्ताहिके, मासिके यायारख्या नियतकालिकांची तर गणनाच नाही. दैनिके वाचायला येणारा वाचकवर्ग आजही मोठा आहे.
हल्ली घराघरात इडियट बॉक्स (टिव्ही) आणि हाती चेटूक यंत्र ( स्मार्टफोन) आल्यापासून वाचकवेडा प्राणी दुर्मिळ झाला असला तरी खरा वाचक येथे येतोच येतो. इथल्या वाचन संस्कृतित हजारो वाचक घडले आहेत.तासोनतास वाचनालयात रमायचे.आपल्या बुद्धीबलावर नगरसेवक, नगराध्यक्ष झालेले, अनेकविध विषयांचा दांडगा व्यासंग असणारे नगरपालिकेचे आधिकारी, नगरसेवक वडगावास मिळाल्याने त्यांनी युवकांना वाचनाकडे वळते केले. त्यांच्या जाणत्या ज्ञानाने आणि कार्य कतृत्वाने हे वाचनालय समृद्ध होत गेले.अशी किती नांवे सांगावित. त्यामुळेच अनेक वाचनवेडे सामान्य नागरिकांपासून ते डॉक्टर, विधिज्ञ, चार्टर्ड अकाऊंटंट, प्रतिथयश व्यवसायी, येथे आपली ज्ञानतृष्णा भागविण्यासाठी अन् विविधांगी वाचनवेड जपण्यासाठी आवर्जुन येतात.इथे असणारे ग्रंथपाल सुनिल काशिद साहेब सहकाऱयाने वावरत असतात. वाचकाशी आपुलकीने पुस्तकाबद्दल बोलत असतात. तुम्ही पुस्तकाचे नाव वा लेखक सांगा ते पुस्तक उपलब्ध आहे की नाही लगेच सांगतात अन् शोधून द्यायला मदतही करतात. वाचकांना सदैव त्यांचा आधार वाटतो.
वाचनाने संस्कृतता,सहिष्णूता माणसाच्या अंगी अगदी वाऱ्याच्या स्पर्शासारखी लागते आणि त्याची सुखद जाणीव इतरांनाही दिसुन येते.एकंदरीतच काय 'पुस्तक’ आपला'मित्र'आहे असे आपण म्हणवतो.आणि अर्थातचं मित्राला भेटायची जागा म्हणजे कट्टा,नाका..पण पुस्तकरूपी या मित्राला भेटायाची जागा म्हणजे हे वाचनालयं.
वाचनालयाच्या काही अडीअडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी ग्रंथपाल सुनिल काशिद हे कायम प्रयत्नशील असतात. सभासद संख्या संख्या ही लोकसंख्येच्या प्रमाणात पाहिले तर अत्यल्प आहे, लोकसंख्येच्या मानाने या ठिकाणी दीड-दोन हजार च्या ही वरती सभासद यायला हवे आहे परंतु हे प्रमाण कमी आहे आजच्या मोबाईल योगामुळे तसेच टीव्ही च्या वापराने मोबाईल वापराने वाचनाकडे दुर्लक्ष झालेले दिसून येते आहे वाचक कमी झालेला आहे
सुमारे ४० वर्ष पूर्ण केलेली ही पुस्तकशाळा म्हणजे वडगाव नगरीचे जिते जागते विद्यापिठ आहे. शारदेचे स्थान आहे. त्याच्या छत्रछायेत यापुढेही साहित्यीक, राजकारणी विधिज्ञ, अभियंते, व्याख्याते, डॉक्टर आदी विद्वान निर्माण व्हावेत.व वडगावची किर्ती दिगंतात न्यावी.