दत्तक्षेत्र – कडगंची

⭕ दत्तक्षेत्र – कडगंची गुरूचरित्र लिहिलेले ठिकाण ⭕
      _______________
⭕ आदिलशहाने स्थापलेले मंदिर ⭕
_________________________
माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
_________________________
दि १६ आॅगष्ट २०२०
कर्नाटक राज्यात गुलबर्गा पासून २१ कि.मी. वर गुलबर्गा-आळंद रस्त्यावर असलेले हे दत्तक्षेत्र सायंदेवाचे स्थान म्हणून प्रसिद्ध आहे. श्री नृसिंह- सरस्वतींच्या करुणा पादुकांची इथे स्थापना केलेली आहे. दत्तात्रेयांची काळ्या पाषाणातील अत्यंत विलोभनीय मूर्ती इथे विराजमान झालेली दिसते. श्रीदत्तात्रेयांच्या अवतारपरंपरेतील श्रीनृसिंहसरस्वतींचा चरित्र व कार्यविषयक प्रमाणग्रंथ म्हणजे त्याचे शिष्य श्री सायंदेव यांच्या पाचव्या पिढीतील सत्पुरुष श्री सरस्वती गंगाधर यांनी श्रीगुरुचरित्र हा लिहिलेला प्रासादिक आणि उपदेशस्वरूप ग्रंथ होय. सायंदेव हे कडगंचीचे असल्यामुळे श्रीसरस्वती गंगाधर यांनी हा ग्रंथ कडगंची इथेच लिहिला. त्याची मूळ प्रत इथे आहे. सध्या त्यावरच दत्तमंदिर उभे असून ते आता श्रीसायंदेव दत्तक्षेत्र संस्थान या नावाने परिचित आहे. गुरुचरित्राची मूळ प्रत इथे असल्याने श्रीनृसिंहसरस्वती यांची वाङ्मयमूर्तीच इथे आहे असे समजले जाते. दत्तसंप्रदायामध्ये दत्तगुरूंच्या पादुकांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. श्रीनृसिंहसरस्वतींचे चार पट्टशिष्य होते. सायंदेव, नंदीनामा, नरहरी आणि सिद्धमुनी. नृसिंहसरस्वतींच्या पादुका सायंदेव यांना पूजेसाठी मिळाल्या होत्या. सायंदेव यांच्या कडगंची येथील घरी त्यांच्या वंशजांनीसुद्धा त्या जतन करून ठेवल्या होत्या. त्यांनाच करुणापादुका असे म्हणतात. देवस्थानातील दत्तात्रेयांच्या मूर्तीजवळ या पादुका ठेवलेल्या आहेत. सायंदेवांच्या राहत्या घराचे पुनरुज्जीवन करून तिथे सध्याचे श्रीसायंदेव दत्तक्षेत्र संस्थान झाले आहे. श्रीशिवशरणप्पा मादगोंड यांनी अपार कष्ट करून या देवस्थानाचा जीर्णोद्धार केला आहे. जवळच असलेल्या गाणगापूरला निर्गुण पादुका आणि कडगंची इथे असलेली श्रीगुरुचरित्राची मूळ प्रत यामुळे ही दोन्ही ठिकाणे दत्तसंप्रदायामध्ये महत्त्वाची ठरली आहेत. दत्तजयंतीच्या निमित्ताने ‘कडगंची कस्तुरी’ नावाची स्मरणिका दर वर्षी इथे प्रकाशित केली जाते. संस्थानची गोशाळा असून भक्तांसाठी यात्रीनिवासाची सोय इथे आहे.
श्री सायंदेव दत्त देवस्थान ट्रस्ट समिती,
श्री क्षेत्र कडगंची, ता.आळंद, जि.गुलबर्गा, कर्नाटक
संपर्क क्र.- (०८४७७) २२६१०३, ९७४०६२५६७६
______________    
विजापूरला दत्ताचे एक पुरातन मंदिर असून ते तिथल्या नृसिंह मंदिर परिसरातच वसलेले आहे. या मंदिराबद्दल असे सांगितले जाते की, श्रीनृसिंहसरस्वतींचा एक मुसलमान भक्त त्या वेळच्या विजापूरचा बादशहा इब्राहिम अली याने या मंदिराची स्थापना केली आहे. तर काही संदर्भानुसार इब्राहिम अली या मंदिरात दर्शनासाठी येत असे. गुरुचरित्राच्या ९ व्या आणि ४९ व्या अध्यायात एका रजकाची कथा येते, त्यानुसार श्रीपाद श्रीवल्लभ यांचा एक रजक भक्त त्यांच्याकडे राजा होण्याची इच्छा व्यक्त करतो. श्रीपाद श्रीवल्लभ त्याला तू पुढील जन्मात राजा होशील असा वर देतात. तोच हा इब्राहिम अली होय, असे मानले जाते. त्याच्या पायाला झालेली जखम श्री नृसिंहसरस्वती यांनी केवळ दृष्टीमात्रे बरी केली आणि त्याला पूर्वजन्मीचे स्मरण करून दिले. नंतर हा बादशाह स्वामींचा अनन्यभक्त झाला अशी ही कथा. आपल्या दर्शनाचा लाभ निरंतर घडावा अशी त्याने स्वामीचरणी मनोभावे प्रार्थना केली. त्याचा सद्भाव पाहून स्वामींनी ती मान्य केली. विजापुराभोवती असलेल्या खंदकाच्या मध्यभागी पश्चिमेस जो पिंपळाचा वृक्ष आहे तिथे किल्ल्यात माझ्या पादुका तुला मिळतील त्यावर मंदिर बांधून माझी सेवा कर असे स्वामींनी त्याला सांगितले. स्वामींनी सांगितल्याप्रमाणे बादशहास त्या पिंपळवृक्षाखाली पादुका सापडल्या. त्यावर त्याने मंदिर बांधले व श्रींची सेवा केली. पुढे त्या पिंपळवृक्षाला आत घेऊनच नृसिंहाचे देवालय उभारण्यात आले. आणि मंदिरात दत्तमूर्ती बसविण्यात आली. देवालयाला लागून पाण्याचा मोठा खंदक आहे. या खंदकाला देवळाच्या अंगाने एक घाटही बांधण्यात आलाय. या मंदिरात गुरुवारी आणि धार्मिक सणांच्या दिवशी श्री दत्ताचा छबिना काढतात. दत्तजयंती आणि गणेश चतुर्थी हे दोन उत्सव इथे मोठय़ा प्रमाणावर साजरे केले जातात. या मंदिराची माहिती असलेले पुरातन शिलालेख विजापूरच्या पूर्व आणि उत्तर दरवाजाजवळ बसवलेले आहेत.

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম